मेव्हण्याचा पाव्हना...आते भाऊ मावस साला अशी भन्नाट नातीगोती सांगत निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. कधीकधी या लोकांची मोठी फजितीही होते. तरीही निवडणुकीत हे सारं चालायचंच... सध्या निवडणुकांचा जोर शिगेला पोहोचलाय. नातीगोती सगेसोयरे झाडून सारी नाती आता घट्ट विणली जाताहेत. एकमेकांच्या नात्याची 'आन बान शान' देत मतदारांना आकर्षित केले जाते. उमेदवार जरी स्वार्थासाठी असे करत असले तरी या उल्लू नातलगांचं मात्र कौतुक वाटतं. प्रत्येक निवडणुकीत उभा ठाकलेला उमेदवार यांच्याच नात्यातला कसा ? असा प्रश्न सहजच पडतो. उमेदवारांचे एकवेळ समजू शकते, मात्र काही नवशे असलं नसलेलं अवसान आणून जेव्हा नातं जोडायचा प्रयत्न करतात, तेव्हा अती झालं अन् हसू आलं असेच होते. काल एका ठिकाणी कॉर्नर सभा होती. उमेदवाराची पत्नी सभेचे नेतृत्व करत होती, त्यावेळी या नवश्या नातेवाईकांचा तोरा सातव्या आसमानावर होता. या नवशांचं उमेदवाराशी नात एवढं घट्ट जुळलं की उपस्थितांना कसंकसं व्हायला लागलं. कधी यांच्या घरी दिसले नाही, कधी सोबत आढळले नाही. अचानक येवढं जवळचं नातं कसं निर्माण झालं ? याचाच शोध उपस्थित घेत होते. उमेदवारांच्या भाषणात त्यांचा साधा उल्लेखही झाला नाही तरीही त्यांच्या टाळ्यावर टाळ्या थांबत नव्हत्या. पाहुण्याचं पाव्हन आमचं मेव्हनं असं म्हणत यांनी कॉलनीत शान एवढी मारून घेतली की कॉलनीला काय हवं ते देऊ हे सांगून टाकलं. मतदारांची शिरगणती करीत अन अन आपले किती याची बेरीज लावीत उमेदवाराच्या समर्थकांनी मोठमोठी आश्वासने याच सभेत दिली. गंमत म्हणजे गेल्या वेळीही तीच आश्वासन दिली होती हे उमेदवार जसे विसरले तसे मतदारही विसरलेत ! बरे, त्याबाबत चकार शब्द काढायचीही कुणाची हिंमत झाली नाही. पाहुण्याचं नातं जोडलं की तिथं सार संपलं ! कोणतीच नाराजी नाही कोणताच प्रश्न शिल्लक उरत नाही. या नात्याने, नात्यांच्या गोतावळा विजयाची गुढी उभारली जाईल, असा समज या लोकांचा झालाय. मात्र आता मतदार राजा याला भुलणार नाही. जर तुमचं आमचं नातं हाय तर भाऊ विकासाचं थोडं पाह्य... असं आता मतदार बोलू लागलेत. विकासाच्या प्रश्नाला या प्रश्नाला नात्यांच्या दोऱ्यात गुंफणारे उमेदवार पराभूतच व्हायला हवेत. यांना नातं केवळ निवडणुकीतच आठवतं का ? नसलेलं नातं आणि फाटलेला पदर पुन्हा जोडून स्वतःची उसवलेली आर्थिक घडी हे भक्कम करतात. निवडून आलेल्या उमेदवारांच्या नातेवाईकांपैकी किती जणांचे भविष्य बदलले याचा विचार केला तर उणीपुरी दहा कुटुंब सापडतील. बाकी मेव्हण्यांचे पाहुणे अन पाहुण्यांचे मेव्हूने जमिनीला रांगताहेत, याकडे यांचं लक्ष जात नाही. जी लोक उगीच नातं जोडून डार्लिंग डार्लिंग म्हणत आहेत. त्यांना हे समजायला हवं. निवडणुकीपुरती नातीगोती आणि नंतर मात्र 'आमचीच शिंपले...आमचीच मोती... असं यांचं गणित असतं यात शंका नाही.